मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यादरम्यान राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, कधी चिखलफेकही होते. मात्र यातच महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून टीका केली असून यामुळे महाविकास आघाडीकडून निशाणा साधला जात आहे. अशातच अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशारा दिला आहे.
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले आणि त्यांना थेट इशारा दिला. अजित पवार यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.’, असा धमकी वजा इशारा अजित पवारांनी सदाभाऊ खोतांना दिला.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची प्रचारसभा नुकताच पार पडली. या प्रचारसभेमध्ये महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत हे देखील सहभागी झाले होते. इतर नेत्यांप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी देखील विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पण त्याची जीभ घसरली. ‘शरद पवार यांना ९ महिने लागले आणि कळा फुटल्या. पण शरद पवारांना मानावं लागेल. शरद पवार सांगत सुटले आहेत की, मला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यांना कसला चेहरा बदलायचा आहे. तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र घडवायचा आहे का?, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.