मुंबई । राज्यात परतीच्या पावसाने उघडीप घेतल्याचं आता थंडीचा जोर कधी वाढणार? असा प्रश्न आहे. राज्यातील अनेक शहरी भागात सध्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. नागरिक उकाड्याला त्रासलेत. तर गावाकडे सकाळच्या सुमारास थोडी हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. आज (6 नोव्हेंबर 2024) हवामानाचा अंदाज कसा असेल जाणून घेऊया.
महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरु आहे. विदर्भ आणि कोकणात उन्हाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पहाटे गारठा दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. त्याचबरोबर अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. पहाटे गारठा वाढत असला तरी राज्यात गुलाबी थंडीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात थंडीला कधीपासून होणार सुरूवात?
भारतामध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी सुरु झालेली आहे. दिल्लीसह हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. पण महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.