जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. मात्र याच दरम्यान एरंडोल- पारोळा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करणारे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे सकाळपासूनच नॉटरीचेबल आहेत.
एरंडोल- पारोळा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. दरम्यान महायुतीत या मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेले ए.टी. पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आज माघारीचा शेवटचा दिवस असून आज सकाळपासून ए.टी. नाना पाटील यांचा मोबाईल स्विच ऑफ असून ते जिल्ह्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
माजी खासदारांची पुढची भूमिका काय?
भाजपचे पक्षश्रेष्ठी हे ए. टी. नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र ए. टी. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने माघारी होणार किंवा नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. परिणामी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतात की निवडणूक लढविण्यावर ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीची चिंता वाढणार आहे.