मुंबई । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु उमेदवारांच्या प्रचाराला जोर आला आहे. मात्र यातच महाविकास आघाडीमधील काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागलंय. यामागील कारण म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हक्काच्या जागांवर काँग्रेसला पाणी सोडावं लागलं. यावरुन पक्षात नाराजी उफाळली. त्यातून पुन्हा पक्षांतर आणि बंडखोरीला ऊत आलाय.
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि ज्येष्ठ नेते रवी राजांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्यानं विद्यमान आमदार जयश्री जाधवांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे कोल्हापुरात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
त्यामुळे लोकसभेत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभेच्या तोंडावर फुटीचं ग्रहण लागलंय. याचबद्दल बोलताना रवी राजा म्हणाले आहेत की, माझ्या अनुभवाचा उपयोग केला नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकांआधी राज्यातील काँग्रेसचे बडे नेते भाजपवासी झाले. आगामी काळात आणखी किती काँग्रेसी भाजप आपल्या गोटात सामील करुन घेणार आणि त्यातून शत प्रतिशत भाजपचं ध्येय कसं साध्य होणार हेच पाहायचं.