जळगाव । विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेरमधून तृतीयपंथी शमिभा भानुदास पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे.तृतीयपंथी म्हणून विधानसभेसाठी राज्यातून पहिल्याच आणि एकमेव अशा त्या उमेदवार आहेत.
३९ वर्षीय शमिभा या एम.ए. (मराठी) शिक्षित असून कवी ग्रेस यांच्या साहित्यावर त्या पीएच.डी. करीत आहेत. २८ हजार ३८० रुपयांची ठेव आणि ९५ हजारांची रोकड हाती असणाऱ्या शमिभा यांचा अर्जही वैध ठरला आहे. यामुळे त्या आजपासून प्रचारात व्यस्त झाल्या आहेत.
शमिभा यांचे पूर्वीचे नाव शाम मीना भानुदास पाटील असे होते. त्यांनी नंतर शमिभा असे नाव केले. ३० व्या वर्षी तृतीयपंथी असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि तृतीयपंथी घटकासाठी समोर आल्या. दरम्यान भादली (ता. जळगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथीने सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. महिला संवर्गातून भरलेला अर्ज तत्कालिन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला. त्याविरोधात शमिभा यांनी एल्गार उठवत थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयाने अंजली पाटील यांचा अर्ज वैध ठरविल्याने तृतीयपंथी घटकाने अर्धा लढा जिंकला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अंजली पाटील विजयी झाल्या. त्यानंतर शमिभा पाटील या चर्चेत आल्या. आता स्वतः शमिभा या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.