जळगाव । जळगाव शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. दरम्यान त्यासोबत सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे व पती सुनील महाजन यांच्याकडे १२ कोटी १५ लाख ७३ हजार ५४४ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
जयश्री महाजन या व्यवसायाने शिक्षिका तर त्यांचे पती सुनील महाजन हे मुख्याध्यापक आहेत. जयश्री यांच्याकडे १ लाख ९५ हजार रुपये तर पतीकडे २ लाख ५०० रुपये रोख आहेत. महाजन दांपत्याकडे ७० लाख ५७ हजार ३६९ रुपयांचे ८८१.४ ग्रॅम सोने तर १९ लाख ८० हजार ५६१ रुपयांची १९३०० ग्रॅम चांदी आहे. बँकांमध्ये ५४ लाख ३ हजार ८६७ रुपयांच्या ठेवी आहेत. ५० व ३० अशा एकूण ८० लाख रुपये किमतीच्या दोन महागड्या कार महाजन यांच्या पतीच्या नावावर आहेत. जयश्री महाजन यांनी ९ लाख ९२ हजार ४२३ रुपयांचे गृहकर्ज काढलेले आहे. तर पतीवर ५९ लाख ४९ हजार ९१७ रुपयांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.