जळगाव । पाचोरा-भडगाव मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघात आता महायुतीमध्ये बंडखोरी होताना दिसत आहे. कारण गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अमोल शिंदे हे पाचोरा-भडगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवले होते. ते अवघ्या 1500 मतांनी पराभूत झाले होते.
काय म्हणाले अमोल शिंदे
“जनतेचा सेवक म्हणून, जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. एक निष्ठा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संघटन माझ्याकडे असल्याने 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलं आहे आणि याच विश्वासावर लाखाची मतं घेऊन आम्ही यावेळची निवडणूक जिंकू. मागच्या वेळपेक्षा यावेळची परिस्थिती मला अनुकूल आहे. मागच्या वेळेस विद्यमान आमदार महायुतीकडून तर माजी आमदार आघाडीकडून उभे होते आणि यावेळी त्यांच्यातील मतांचे विभाजन झाले आहे”, असं अमोल शिंदे म्हणाले.
‘मला नाही वाटत की माझा पक्ष माझी हाकालपट्टी करेल’
“गिरीश महाजनांचा मी मानसपुत्र आहे. तसेच पक्षश्रेष्ठींविषयी एक वेगळी भावना माझ्या मनामध्ये आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लोकांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक अपक्ष लढणारच आहे. माझी हकालपट्टी करणे हा आमदारांचा विषय नाही. हा माझ्या पक्षाचा विषय आहे. मला नाही वाटत की माझा पक्ष माझी हाकालपट्टी करेल. पाचोरा भडगाव मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीने स्वतः करिता मागितली होती. आमदारांना पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने स्पष्टपणे नाकारलं आहे”, असा दावा अमोल शिंदे यांनी केला.