अकोला : एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना त्यातच भाजपात राजीनामा सत्र सुरु आहे. अकोल्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील तीनशेवर भाजप कार्यकर्त्यांनी काल राजीनामे पाठविल्यानंतर आता आज बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास २०० वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे पाठवले. यानंतर भाजपचे अनेक पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला रवाना झाले आहेत.
भाजपच्या (BJP) दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळें यांचे तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठी यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विरोधात आज (Murtijapur) बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांंनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांनी हरीश पिंपळीशिवाय दुसरा उमेदवार चालून घेणार नसल्याचा इशारा पक्षाला दिला. हे सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये असल्याने त्यांना भेटायला नांदेडकडे निघाले आहेत. पक्ष उमेदवारी देणार नसेल तर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान पक्षाने दुसरा उमेदवार दिल्यास आपण पक्षाचं काम करणार नाही; असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.