जळगाव । जळगाव जिल्ह्यात पोलीस नाकाबंदी दरम्यान जवळपास २ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठलेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी जळगाव पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्याभरात पोलिसांकडून नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठी येथे नाकाबंदी करून एका कारमधून ७ लाख 22 हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त केली, कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ नाकाबंदी तब्बल १ कोटी ४५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारोळा चौफुली येथे वाहनांची तपासणी दरम्यान २ लाख ४९ हजार रुपये जप्त केले आहेत.
जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी नाकाबंदी येथे एका व्यक्तीच्या ताब्यातून १ लाख ४६ हजार १२० जप्त केले आहे. भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरड फाटा येथे एसएसटी पथकाने कारवाई करत एका व्यक्तीकडून ऑटोमेशन पिस्टल, सोबत १८ प्लास्टिक बुच आणि ३० छेरे आणि वाहन जप्त केले. तसेच दारूबंदीच्या कारवाईमध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाटेश्वर मंदिराजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या २ जणांनी कडून ७ किलो ३६० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. भगूर गावाजवळ ३ किलो १३० ग्रॅम वजनाचा ६२ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौकात दुचाकीवरून २ किलो ७१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे, तर जळगाव शहरातील वावडदा नाक्याजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ लाख १३ हजार ९९२ रुपये किमतीचे देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे, असा एकूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ कोटी ५८ लाख १७ हजार ६२० रूपयांची रोकड, ६ लाख १३ हजार ९९२ रूपयांची देशी विदेशी दारू आणि ३ लाख १० हजार ८०० रूपयांच आमली पदार्थ आणि वाहने असा एकुण १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.