जळगाव । जळगाव जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. लोकसभा २०२४ निवडणुकीत भाजपला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी खासदार उन्मेष पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. चाळीसगाव मधून ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म देखील मिळाल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, महायुतीकडून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सैनिक समाज पार्टीकडून देखील वाल्मीक सुभाष गरुड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे चाळीसगावमधून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता लागली आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राजीव देशमुख हे तुतारीचे चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेली आहे. आता ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्मेष पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईवरून चाळीसगावच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, उन्मेष पाटील यांच्या नावाची पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.