ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे हा रेल्वे अपघात झाला आहे. ओंडा स्थानकात लूप लाइनवर मालगाडी उभी होती. दरम्यान त्याच रुळावर दुसरी मालगाडी येऊन रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात दोन्ही मालगाड्यांचे एकूण 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात चालत्या मालगाडीचा चालक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मालगाडी बांकुराहून बिष्णुपूरला जात होती. अपघात एवढा भीषण होता की मालगाडीचे डबे रुळावरून वेगळे होऊन एकमेकांवर चढले. त्याचबरोबर या दुर्घटनेमुळे रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला असून, ट्रेनचे इंजिन रुळावरून उलटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याचबरोबर मालगाडीच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्याचेही दिसत आहे.
#WATCH | West Bengal: Two goods trains collided at Onda railway station in Bankura. Rail operation on Kharagpur–Bankura–Adra line has been halted. More details awaited. pic.twitter.com/T4sL5rn7Rp
— ANI (@ANI) June 25, 2023
या अपघातामुळे पुरुलिया हावडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या राहिल्या. पोरबंदर संत्रागाछी एक्स्प्रेस पुरुलिया स्थानकावरून चंडील टाटानगर मार्गे वळवण्यात आली आहे. अपघातामुळे आणखी काही गाड्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
घटनास्थळी उपस्थित रेल्वे अधिकारी
या रेल्वे अपघाताची चौकशी रेल्वे अधिकारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी हजर आहे. ज्या डब्यांचे जास्त नुकसान झाले आहे ते रुळावरून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. हा अपघात मालगाड्यांऐवजी पॅसेंजर गाड्यांमध्ये झाला असता, तर अधिक जीवित व वित्तहानी झाली असती, अशी चर्चा काही लोक या अपघाताबाबत करताना दिसली. ओडिशातील बालासोर येथे नुकताच मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते.
Discussion about this post