केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधित झालेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केंद्रीय अन्वेषण विभागाने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट), ४६६ (बनावट), ४७४ (बनावट दस्तऐवजाचा वापर) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत आरोप ठेवले आहेत. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधित २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासादरम्यान नवटके यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सीआयडीच्या अहवालानुसार पुणे पोलिसांनी भाग्यश्री नवटकेविरुद्ध ऑगस्टमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. या अहवालामुळे घोटाळ्याच्या तपासातील गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी समोर आल्या. महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. २०२१ -२२ मध्ये भाग्यश्री नवटके पुणे जिल्ह्यातील विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्या भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीशी संबंधित घोटाळ्यांचा तपास करत होत्या.
सीआयडीच्या तपासात नवटके याच्यावर एकाच दिवशी एकाच गुन्ह्यांतर्गत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यांच्या अनुपस्थितीत तक्रारदारांच्या सह्याही घेतल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारांच्या आधारे महाराष्ट्राच्या गृहविभागाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.