जळगाव: जामनेर तालुक्यातील जांभळी येथील कैलास विठोबा वडाळे (वय ४९,) यांचा कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. अखेर हत्येच्या ४० दिवसानंतर खुनाचा उलगडा झाला आहे. धक्कादायक म्हणजेच मित्रानेच कैलास वडाळे यांचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याची महिती समोर आली. रमेश संपत मोरे (वय ५४, रा.वडाळी ता.जामनेर) असे आरोपीचे नाव असून त्याने खुनाची कबुली दिली.
मात्र मृतदेह नेमका कुठे, त्याची विल्हेवाट कशी लावली याबाबत संशयित पोलिसांना काहीच माहिती देत नसल्याने दृश्यम चित्रपटातील कथानकातील पोलिसांप्रमाणेच मयताचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान जळगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील रहिवासी कैलास विठोबा वडाळे यांचा मुलगा अविनाशने १४ मे रोजी पहूर पोलीस स्टेशनमध्ये वडील कैलास वडाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पहूर पोलीस महिनाभर वडाळे यांचा ठावठिकाणा शोधत होते. पण काहीच हाती लागले नाही. कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले. कैलास वडाळे यांची रमेश संपत मोरे यांच्यासोबत मैत्री होती. कैलास बेपत्ता झाले याची गावासह परिसरात चर्चा झाली. तरीही मित्र रमेश याने कैलास यांच्या परिवाराशी संपर्क केला नाही. रमेशने कैलास यांच्या कुटुंबाकडे त्यांची साधी विचारपूससुद्धा केली नव्हती. याच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचा धागा सापडला.
तपास केल्यानंतर दोनच दिवसात २० जूनला स्थानिक गुन्हे शाखेने मयत कैलास वडाळे यांचा मित्र रमेश मोरे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यावर रमेशने कैलास वडाळे यांचा खून केल्याची कबुली दिली. घटनास्थळदेखील दाखवले. घटनास्थळी मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू सापडल्या. मात्र कैलास वडाळे यांचा मृतदेह मिळाला नाही. त्यानुसार याप्रकरणी मयत कैलास वडाळे यांचा मुलगा अविनाश याच्या फिर्यादीवरुन पहूर पोलिसात बुधवारी रात्री उशिरा रमेश मोरे यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पण रमेश याने नेमका कोणत्या कारणावरुन कैलास यांचा खून केला हे समोर आलेले नाही. पोलिसात दिलेल्या तक्रारीत मात्र कैलास यांच्याकडून रमेशने २० हजार रूपये उसने घेतले. यावरुन वाद होऊन खून झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post