धुळे । राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यातच धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळेच अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
२७ हजार १९४ क्यूसेक वेगाने पांझरा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे पांझरा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. पांझरा नदी पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून पुढील काही तासांमध्ये पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्याची शक्यता देखील प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण अखेर १०० टक्के भरले आहे. ६० हजार हेक्टरवरील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पूर नियंत्रण करण्यासाठी येलदरी वीजनिर्मिती केंद्राच्या तीन दरवाजातून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या दरवाजामधून शनिवारी सकाळी ४४ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणास येलदरी धरणाच्या जलविद्युत केंद्रातील तीन संचांमधून वीजनिर्मितीद्वारे पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.