मुंबई । राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लाडकी बहीण योजने’बद्दल केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, “मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच विधानावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात सरकारतर्फे लाभार्थी महिलांना दर महिना 1250 रुपयांचा निधी देण्यात येतो. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरुन राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. अशातच आता संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे तर महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते, असा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 353 (2) चुकीची माहिती प्रसारित करणे,भ्रम पसरवणे,आणि 356 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post