मुंबई : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
Discussion about this post