जामनेर । जळगाव जिल्ह्यात अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील वाडी गावाजवळ ट्रक आणि इंडिका गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. बळीराम वाघ (३०) असे मयत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरीपासून काही अंतरावर असलेल्या वाडी गावाशेजारी पुलावर ट्रक आणि इंडिका गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की धडक दिल्यानंतर इंडिका लांब अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील लिहा येथील रहिवाशी मनोज बळीराम वाघ या इंडिका कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावा लागला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर आणि बोदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करत रुग्णवाहिकेने मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक चालक विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post