एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात आठ जण भाजल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. आठपैकी चार जण गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे.
याबाबत असे की, अनिल पुना मराठे (मानकीवाले) याच्या घरातील सिलिंडरमधील गॅस संपल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून सिलिंडर आणले होते. या सिलिंडरचे रेग्युलेटर लावताना गॅस गळती सुरू झाली. गळती थांबत नसल्याचे पाहून अनिल याने ते सिलिंडर स्वयंपाक घरातून बाहेरच्या खोलीत फेकले. या घटनेमुळे सर्व कुटुंब घरातून बाहेर पळाले. घराशेजारी असलेल्या किराणा दुकानाचे मालक व काही ग्राहकांनी सिलिंडरवर गोणपाट टाकून रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. यात आठ जण भाजले गेले. जखमींपैकी ज्ञानेश्वर पाटील व इतर ३ जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हळविण्यात आले आहे.
दरम्यान, अनिल मराठे यांचे घर जुने लाकडी बांधकामाचे असल्याने घराने नंतर पेट घेतला, एरंडोलहून आलेल्या अग्निशमन दलाने आग विझविली. जेसीबीच्या साहाय्याने हे घर पाडण्यात आले. साधारण परिस्थिती असलेले अनिल मराठेंचे कुटुंब आजच उघड्यावर आले आहे.
जखमींची नावे अशी
अनिल मराठे (४५), भाऊसाहेब शामराव गायकवाड (४५), सागर किसन मराठे (३२), ज्ञानेश्वर देवराम पाटील (४०), आबा सुकदेव चव्हाण (५०), दीपक रमेश खैरनार (४०), शुभम सुरेश पाटील (२०) आणि नगराज देवराम पाटील (५०) अशी भाजलेल्यांची नावे आहेत.
Discussion about this post