भुसावळ । तालुक्यातील वरणगाव येथून एक ह्रदयद्रावक घटना समोर आलीय. ५ वर्षीय मुलाचा हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कर्णव महेंद्रकुमार बडगुजर (५) असे मयत बालकाचे नाव असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, मुळचे दोंडाईचा येथील रहिवासी असलेले महेंद्रकुमार बडगुजर हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील सरस्वती नगर येथे पत्नी, दोन मुले या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. महेंद्रकुमार बडगुजर हे भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत ११ वर्षापासून शिपाई पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी सांयकाळी ७ वाजेदरम्यान परिवारातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर महेंद्रकुमार बडगुजर यांचा पाच वर्षीय लहान मुलगा कर्णव हा या परिसरात राहणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, अर्धा तास झाला तरीही कर्णव घरी आला नाही. यामुळे आईवडील आणि भावाने त्याचा परिसरात शोध घेतला.
याचदरम्यान घराबाहेरच जमिनीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात कर्णव पडलेला दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने कुटुंबियांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कर्णवच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. कर्णव हा शहरातीलच सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सिनीयर केजीमध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच शाळा सुध्दा सुरू झाली होती.
काही दिवसांपूर्वी कर्णव याच्या कुटुंबियांनी पाणी साठवण्यासाठी घरासमोर जमिनीत पाण्याचा हौद बांधला होता. मात्र हाच हौद कर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल अशी कल्पना कर्णवच्या कुटुंबियांना नव्हती. नेमकं याच हौदात कर्णवचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. निलेश बेंडाळे यांच्या माहितीनुसार वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्णवच्या दुर्देवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post