जळगाव । रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने दापोरा (ता.जळगाव) येथील २५ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सुवर्णा पंडित पाटील (वय २५ रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत तरुणीचे नाव असून याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळची दापोऱ्यातील असणारी सुवर्णा हि सध्या शिरसोली येथील बहिणीकडे राहत होती. गुरुवारी दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शेतात जात होती. त्यावेळी दोनपुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना तिला रेल्वेगाडीचा धक्का लागल्याने ती जागीच गतप्राण झाली. तालुका पोलीस स्टेशनला दापोराचे पोलीस पाटील जितेश गवांदे यांनी माहिती दिली.
यानंतर पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे आणि धनंजय पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.
Discussion about this post