पारोळा । आपला भाऊ संस्थेचा चेअरमन असल्याचा धाक दाखवून शिपायाला १० हजारांची लाच मागणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गौतम बालूप्रसाद मिसर असे या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो संस्थेत १ लाख ३२ हजार रुपये वेतन घेतो.
नागरी एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये अविनाश पाटील हे शिपाई पदावर कार्यरत आहेत. मिसर याचा भाऊ या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याचा धाक दाखवून आरोपी गौतम मिसर शिपायाला नोकरी टिकवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागत होता. वारंवार धमकावत होता. याबाबत अविनाश पाटील यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. गौतम मिसर यांनी १० हजार रुपये शाळेतील शिक्षक सचिन पाटील अथवा धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे एसीबीच्या पडताळणीत उघड झाले. त्यावरुन गुरुवारी सापळा रचून गौतम यास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम मिसर हे संस्थेचे चेअरमन यांचे लहान बंधू असून गेल्या २९ वर्षांपासून ते संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील तीन महिन्यांपासून तो प्रभारी मुख्याध्यापक म्हणन काम पाहत आहे.
Discussion about this post