जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी संचालक प्रा. ए. एम. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पकिंमतीत धातुच्या पातळ फिल्मस् आणि कोटींगसाठी थर्मल बाष्पीभवन प्रणाली विकसित केली असून २५ लाख रूपये बाजार मूल्य असलेली ही प्रणाली विद्यार्थ्यांनी काही वस्तूंचा पूर्नवापर करून केवळ ४ लाख रूपयांत विभागातच तयार करण्यात यश मिळवले आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बुधवार दि. २१ जून रोजी या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. ए. एम. महाजन यांनी या प्रशाळेत नॅनो इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि उपकरणे (MDNL Class 10,000) प्रयोगशाळा विकसित केली आहे. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा त्यांनी तयार केलेली असून त्यामध्ये आता ही नवीन थर्मल ईव्हॅपोरेशन सिस्टीम बसविली जाणार आहे. धातुचा अत्यंत बारीक असा थर (कोटींग) सेमी कंडक्टर वेफरवरती करण्यासाठी, तसेच पुढे सुक्ष्म आकाराचे “नॅनो डिव्हाईसेस” तयार करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” या अभियानातून प्रेरणा घेत अत्यंत कमी खर्चात प्रा. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली संशोधक विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेवून तयार केली आहे. संशोधक विद्यार्थी अभिषेक चौधरी याने या प्रणालीचे डिझाइन तयार केले. बाजारमूल्य २५ लाख रूपये एवढे आहे. मात्र केवळ ४ लाख रूपयांत विद्यार्थ्यांनी ही प्रणाली विभागातच निर्माण केली. त्यासाठी प्रयोगशाळेतीलच काही वस्तुंचा पूर्नवापर करण्यात आला. त्यामध्ये जून्या बंद पडलेल्या प्रणालीमधील चेंबर व रोटरी पंपचा पूर्नवापर करण्यात आला. या प्रणालीच्या माध्यमातून बाष्पीभवनासाठी “टंगस्टन” या धातूला गरम करण्यासाठी आवश्यक असलेला २२० ॲम्पीअर पर्यंतचा करंट प्राप्त करणे शक्य झाले. या प्रशाळेत यापूर्वी “पीईएएलडी” ही प्रणाली देखील तयार करण्यात आली होती. विद्यापीठावर कोणताही आर्थिक बोजा न पडता संशोधन प्रकल्पातून या प्रणालींची निर्मिती तसेच प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे हे विशेष. या प्रणालीच्या निर्मितीमध्ये भुषण देसले, वैभव बारोकार, सुमित पाटील, यशल नारखेडे, मनिष पाटील व अश्विनी घाटे या विद्यार्थ्यांचे योगदान आहे.
दि. २१ जून रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सदरील “थर्मल ईव्हॅपोरेशन सिस्टीम” चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरूंनी प्रा. महाजन आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून या प्रकारचे प्रयोग विद्यापीठात होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, प्रा. ए. एम. महाजन, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य एस. एस. राजपूत, व्य. प. सदस्य डॉ. पवित्रा पाटील, डॉ. राजेश जवळेकर, प्रा. एस. आर. चौधरी, प्रा. के. एफ. पवार, डॉ. ललीत पाटील, डॉ. आर. जी. बावने आदी उपस्थित होते.
Discussion about this post