नवी दिल्ली । नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला असून यामुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला आहे
आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच नेते मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काल नागपुरात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी नेहमी प्रमाणेच जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, याबद्दलचा किस्सा सांगितला.
नितीन गडकरी काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.
Discussion about this post