मुंबई । पावसाची प्रतीक्षा पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने एक शुभवार्ता दिली आहे. पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यातील हवामान बदलणार असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात येत्या दोन दिवसांत उन्हाचा तडाखा जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार असा अंदाज आहे. त्नागिरीमध्ये थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुढे ७२ तासांमध्ये होणार असून येत्या दोन तीन दिवसात मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे.
यंदा कोकणात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही थांबल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता मान्सून मुंबईनंतर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचाही आशा पल्लवित होणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच विदर्भात आज हवामान कोरडं असेल आणि उष्णतेचा तडाखा बसेल. असं म्हटलं आहे.
जळगाव जिल्ह्यात कधी बरसेल पाऊस?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात २५ जून ते १ जुलै पर्यंत दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
Discussion about this post