पुणे । महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक भयानक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे. वरवंड येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन पोटच्या मुलांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
घटना काय आहे?
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर असं या 42 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. अतुल दिवेकर हे व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहे. हे कुटुंब वरवंड येथील गंगासागर पार्कमधील रुम नंबर 201मध्ये राहत होते. डॉ. अतुल यांनी आधी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलगा अदिवत अतुल दिवेकर (वय 9) आणि मुलगी वेदांती अतुल दिवेकर (वय 6) यांना विहिरीत ढकलून त्यांना जीवे मारलं. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. एक हसतखेळतं कुटुंब काही तासात संपुष्टात आलं.
कौटुंबिक वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना अतुल आणि पल्लवी यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना तात्काळ मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Discussion about this post