जळगाव । जळगावातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढतच असून अशातच ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाळधी गावाजवळ आज सोमवारी घडली. संदीप गोरख देसले (वय-३५, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, संदीप देसले हा जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. लक्झरीवर चालक म्हणून तो काम करत होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते कासोदा येथून लक्झरीची ट्रिप आणून प्रवाशांना सोडले होते. त्यानंतर कासोदा येथून जळगावकडे येण्यासाठी संदीप दुचाकीने सोमवारी १९ जून रोजी सकाळी निघाला. दरम्यान सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणारी आयशरला हात दिला.
त्यामुळे आयशर ट्रक जागीच थांबला. तेव्हढ्यात संदीप देसले हे दुचाकीने येत असताना मागून जोरदार धडक दिली. यात संदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई अरुणाबाई, वडील गोरख देसले, भाऊ दीपक, पत्नी सोनाली आणि ज्ञानेश्वरी व दर्पण हे दोन मुले असा परिवार आहे.
Discussion about this post