जळगाव । मॉन्सून पर्वास सुरवात होऊन दहा ते बारा दिवसाचा कालावधी उलटला असला तरी जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबत असल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.
पावसाळा सुरू झाला, तरीही तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागले आहे. वातावरणात उकाडा कायम आहे. त्यामुळे पाऊस येणार तरी कधी? याची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच भेडसावू लागली आहे.
साधारणपणे मान्सून १ जूनला केरळात दाखल होतो. मात्र यंदा तो ८ जून रोजी केरळात दाखल झाला. त्यानंतर तीनच दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबला. जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमानापैकी एकाही तालुक्यात ५० टक्के एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे
जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. खरिपाच्या पेरण्यांवर शेतकऱ्यांची दिवाळी अवलंबून असते. खरिपासाठी मृग नक्षत्रातील पाऊस उपयुक्त मानला जातो. यंदा मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन नऊ दिवस झाले तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही.
“थांबलेल्या पावसाचा परिणाम कापसासह फळबागांवर, उडीद, तुर व मुगावर होण्याची शक्यता आहे. खरिपासाठी आवश्यक असलेली तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांनी शंभर मिलीमिटर पाउस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत.”
Discussion about this post