नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गटाला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा काँग्रेसचे नेते भुपेंदर सिंह हुडा, प्रदेशाध्यक्ष उदयभान, काँग्रेस प्रभारी दीपक बावरिया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काही महिन्यांपूर्वीच दूहन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करत शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती.मात्र अचानक त्यांनी शरद पवार, अजित पवारांना धक्का देत काँग्रेसला साथ दिली आहे. लवकरच हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. स्त्री म्हणजे दुर्गा आहे, स्त्री काली आहे, स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि तीच स्त्री इंदिरा आहे, असे ट्वीट सोनिया दूहन यांनी केले आहे.
दरम्यान, सोनिया दुहान या शरद पवार यांच्या विश्वासू नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. २०१९ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी अयशस्वी होण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सोनिया दुहान यांनी भाजपच्या भाजप कार्यकर्त्यांना चकवा देत राष्ट्रवादीच्या चार आमदारांची सुटका केली होती, जे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणार होते.
Discussion about this post