मुंबई । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या भेटीमागचं कारण काय आहे? यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले भुजबळ?
मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण प्रश्नी पवारांनी लक्ष घालावं- भुजबळ
राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
Discussion about this post