जळगाव । शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ जळगावात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला असून त्यांनी याप्रकारचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. तसेच याबाबत चौकशीची मागणी केली होती. आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
नाशिक शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २२ जून रोजी रात्री नऊ वाजता जळगाव शहरातील आदित्य लॉन्स येथे बैठकीसाठी आले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांना मार्गदर्शन केले तसेच किशोर दराडे यांना आपल्या पसंतीचा एक क्रमांक देऊन बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आटोपल्यानंतर आदित्य लॉन्स येथे आलेल्या जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर करत कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल उपस्थित केला.हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान या प्रकारची आता जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
संबंधितांकडून आम्ही खुलासा मागावलेला आहे. त्यांनी तोंडी खुलासा दिलेला आहे. परंतु लेखी खुलासा देणे क्रमप्राप्त असल्याचे आम्ही त्यांना कळविले आहे. पुल्लिंग एजंट यांना पैसे देत असल्याचे त्यांनी आम्हाला कळविले आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलादर हे आवश्यक चौकशी करत आहेत. तथ्य वाटले तर आम्ही नक्कीच गुन्हाच दाखल करू, अशी प्रतिक्रिया जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.















Discussion about this post