पुणे । मान्सून दाखल होताच राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लावली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र अशातच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्याचप्रमाणे, आज आणि पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, सांगली, कोल्हापूर जिल्हा वगळता तर सोमवारी मुंबई,पालघर, ठाणे वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच येत्या 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘या’ ठिकाणी दिलाय यलो अलर्ट
आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पुढील 5 दिवस ही स्थिती राहणार आहे. तसंच पूर्व विदर्भ वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
17 आणि 18 रोजी कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर 18 रोजी सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून 17 रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील यलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे.
Discussion about this post