मुंबई : ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून केरळात वेळेआधी ३० मेला केरळात दाखल झाला असून यानंतर राज्यासह देशात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तर काही भागात पावसाची शक्यता आहे.
कोकणात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट
1 जूनपासून संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. कोकणात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात आज आणि उद्या मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी 40 ते 50 किमी ताशी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कुठे ऊन, कुठे पाऊस
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसात काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या भागातही पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या या भागात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्येही पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.















Discussion about this post