जळगाव/मुंबई । सध्या जळगावसह राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उष्णता वाढली आहे. या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघत असून पुढील आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली.जळगावातही तापमानाचा पारा ४५ अंशावर नोंदविला गेला. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. अनेकांना या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दणिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे.
परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही आगामी तीन दिवस तापमानाचा पारा ४६ अंशावर जाणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. गुरुवारी (ता. २२) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून गेली आहेत. हवामान खात्याने गुरुवारपासून पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Discussion about this post