नाशिक । आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी ७ वाजेपासून सुरु असून याच दरम्यान मात्र नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज याना महागात पडले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
मात्र शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले होते. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती.आता शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतीगिरी महाराजांना भोवले आहे. यामुळे शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
Discussion about this post