बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात 23 मे पर्यंत तीव्र चक्रीवादळाची शक्यता आहे. 23 ते 27 मे दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. या चक्रीवादळामुळे 28 मे रोजी गुजरात आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तुफान अवकाळी पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशामध्ये आता राज्यात आज देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, बुलडाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, अहमदनगर, सांगली, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आणि शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Discussion about this post