जळगाव : एरंडोल येथील केवडीपुरा भागात प्लॉट विक्रीस नकार देणाऱ्या आईचा मुलाने पत्नीसह मिळून जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. मातृदिनाच्या दिवशी मुलाने आईचा खून केल्यामुळे खळबळ उडाली. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) वय ६० वर्षे असे मयत वृद्ध महिलाचे नाव असून याप्रकरणी आरोपी मुलासह सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत महिलेच्या राहत्या घराशेजारी तिच्या नावे असलेला खुला भुखंड मुलगा बापू मोहिते यास विकायचा असल्याने मुलगा व सून वारंवार त्रास देत व मारहाण करीत होते. मृत महिला ही धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील नातेवाईकांकडे काहीकाळ वास्तव्यास होती. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मुलगा व सून यांस समजावून विमलबाई हिस एरंडोल येथे एकत्र राहण्यास पाठवले होते.
रविवारी पहाटे साडेतीन वाजता दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून विमलबाई मोहिते हीचा निर्घृण खून केला.
याबाबत वसंत उमराव मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा-सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.
Discussion about this post