जळगाव । सध्या जळगावसह राज्यात तापमान वाढीने कहर केला आहे. असह्य करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघत आहे. आगामी तीन चार दिवस उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहे. मात्र १० मे नंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आगामी चार दिवस तापमान वाढतेच राहणार असून आज ६ मे पासून ते ९ मे पर्यंत जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशांपर्यंत राहू शकतो. मात्र, त्यानंतर १० मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
सलग काही दिवस तापमानाचा पारा वाढल्यानंतर समुद्रावरील पाणी तापते, यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते व पावसाची स्थिती निर्माण होते. जिल्ह्यात १० मे ते १४ मे दरम्यान काहीअंशी पाऊस होऊ शकतो. तसेच ढगाळ वातावरणदेखील कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.
जोरदार वारे वाहणार….
मे महिन्यात तापमानाचा पारा वाढतोच, मात्र त्यासोबत वाऱ्यांचाही वेग वाढतो. सध्या जिल्ह्यात १८ ते २० किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे उष्णतेची दाहकता अजून जास्त वाटत आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण होत असते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी मान्सूनच्या आगमनाआधी निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस पळविला होता. तसेच मान्सूनचेही आगमन लांबले होते. मात्र, यंदा तशी स्थिती
निर्माण होण्याची सध्यातरी शक्यता कमीच असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
Discussion about this post