गडचिरोली ! गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चक्क विद्यापीठच आपल्या गावात येणार असून सायंकाळी 6 ते 9 या वेळेत तज्ज्ञ प्राध्यापक अध्यापन करणार आहेत. त्यामुळे आदिवासी बहुल ग्रामीण भागातील प्रवेशित विद्याथ्र्यांना बॅचलर ऑफ आर्टस ची पदवी दिली जाणार आहे. या उपक्रमामूळे प्रवेशित विद्याथ्र्यांचा रोजगार न बुडता दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. हा अभिनव उपक्रम राबविणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
बी.ए. च्या अभ्यासक्रमात बांबू क्राफ्टचा समावेश
गडचिरोली जिल्ह्याला बांबुच्या जंगलाचा समृद्ध वारसा लाभला आहे. बांबूच्या कलाकुसरीचे उपजत ज्ञान आणि जाण सुध्दा येथील आदिवासीं समूदायात आहे. त्यांच्या याच उपजत कौशल्याला आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची जोड देऊन त्यांना कुशल कारागीर, व्यवसायीक आणि उद्योजक म्हणून सन्मानाने उभे करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच बीए कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात बांबू कक्राफ्टचा सामावेश केला आहे.
जांभळी गावात महिलांसाठी बांबू कलेचे धडे
मार्च महिन्यात ज्यांना इंग्लंड देशाच्या संसदेत शी इन्सपीरेशन पुरस्कार देण्यात आला. अश्या जगप्रसिद्ध बांबू प्रशिक्षक मिनाक्षी वाळके पहिल्यांदाच विद्याथ्र्यांच्या दारी पोहोचल्या आहेत. त्यांनी गेल्या 6 वर्षात 3 राज्यातल्या 1100 हून अधिक आदिवासीं – वंचित महिलांना प्रयोगशील बांबू कलेचे धडे दिले. “द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र” मीनाक्षी मुकेश वाळके या जांभळी गावात विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमाअंतर्गत बांबू डिझाईनिगचे प्रशिक्षण देत आहेत. बांबू डिझाईन मध्ये 5 नवे प्रयोग, बांबू क्युआर कोड स्कॅनर हा देशातील पहिला मॉडेल साकारणाज्या मीनाक्षी वाळके यांनी जगभर बांबू राखी लोकप्रिय केली आहे.
विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार
गोंडवाना विद्यापीठाद्वारे उन्नत भारत अभियाना अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयाव्दारे आयोजित ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमाच्या माध्यमातून जांभळी या ग्रामपंचायतीमध्ये महाविद्यालय सोडलेल्या विद्याथ्र्यांचे सर्वेक्षण करून 22 विद्याथ्र्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात आली आणि त्या विद्याथ्र्यांंना बी. ए. या पदवी अभ्यासक्रमामध्ये पुनप्र्रवेशीत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
उपक्रमाची व्यापकता वाढणार
गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक देवाची तोफा यांच्या उपस्थितीमध्ये दि.27 मार्च 2023 रोजी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यापीठाच्या परिसरातील अनेक तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक व अनेक विषयाचे प्राध्यापक स्वयंसेवी तत्त्वावर कार्य करण्यास स्वतःहून समोर आलेले आहेत हे विशेष या उपक्रमात भविष्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शंभर गावांचा उद्देश ठेवून उपक्रमाची व्यापकता वाढणार आहे. त्या दृष्टीने अनेक ग्रामपंचायतीतून मागणी सुद्धा येऊ लागलेली आहे.
Discussion about this post