जळगाव : नातेवाइकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी व रोख १० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवार, २६ एप्रिल रोजी समोर आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारदान शिलाईचे काम करणाऱ्या नितीन हिरालाल कुशवाह (४३, रा. श्रावण नगर) यांच्या नातेवाइकांचे लग्न असल्याने ते २० एप्रिल रोजी बन्हाणपूर येथे गेले होते. तेथील लग्नानंतर ते पुन्हा वरणगाव येथे लग्नासाठी गेले.
त्यावेळी घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातून ६० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, रोख १० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.२६ एप्रिल रोजी त्यांना शेजारच्या व्यक्तीचा फोन आला व त्यांचे घर उघडे असल्याचे सांगितले. त्यावेळी कुशवाह हे घरी आले व घरात पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहेत.
Discussion about this post