जामनेर : तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत सात घरे जळून खाक झाली. या भीषण आगीत चार शेळ्यांचा भाजून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सात शेतकऱ्यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले.
पिंपळगाव चौखंबे येथील एका घरात अचानक स्फोट झाला आणि आग लागली, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थ जमले असता त्याचवेळी बाजूलाच असलेल्या समाधान पाटील यांच्या घरातून घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. यामुळे आगीचे पुन्हा रौद्र रुप घेतले. जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, त्याचवेळी एका घरातील आणखी एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
या आगीत वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील, संजय बोराळे, जीवन पाटील, प्रवीण पाटील, धनराज पाटील यांचे घर जळून खाक झाले. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, भांडीकुंडी, शेतमालाचे पैसे व कपडे जळून राख झाले.
आगीत चार बकऱ्यांचा भाजून मृत्यू झाला तर दोन दुचाकींचेही नुकसान झाले. दोन बैल व दोन वासरे भाजले आहेत. माहिती मिळतात निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, तलाठी आर. व्ही. सुपेकर, फत्तेपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.