भुसावळ । रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे चित्र आहे.
दोन महिन्यांपूर्वी श्रीराम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसापूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले.
पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिला अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.