जामनेर । माहेरी राहत असलेली पत्नी व आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीचा निघृण खून करत पतीने स्वतः देखील आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. अंगावर शहारे आणणारी ही घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे उघडकीस आली. विशाल मधुकर झनके (३०) असे खून करणा-या आरोपीचे नाव आहे.
प्रतिभा विशाल झनके (२६) आणि दिव्या झनके (वय नऊ महिने) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. प्रतिभा ही गावचे पोलिस पाटील राजेंद्र इंगळे यांची मुलगी होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी प्रतिभा यांचे पतीशी किरकोळ वाद झाल्याने त्या मुलीसह माहेरी राहात होत्या. शुक्रवारी दुपारी घरात कुणीही नसल्याने संशयित विशाल झनके याने घरात प्रवेश केला आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून पत्नी व मुलीला संपवले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सोडून त्याने घरामागील शेतातून पळ काढला.
हत्या केल्यानंतर तो मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:चे जीवन संपवले. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. विशाल झनके याने हे कृत्य का केले? याची कारण अजून स्पष्ट झाले नाही.