चाळीसगाव । जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात घडलीय. वरखेडे खुर्द येथे ३५ महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला. यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह नदीपात्रातील वाळूमध्ये बुजण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र मारेकऱ्याला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयिताने खुनाची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील महिला मुलासह २ मार्चला रात्री दहाला झोपली होती. महिलेच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केल्याने तिचे पती तेथेच होते. दरम्यान ३ मार्चला पहाटे चारला महिलेच्या मुलाला जाग आली असता त्याला त्याची आई आढळून आली नाही. त्यामुळे त्याने धावत जाऊन शेजारी राहणाऱ्या काकाला याबाबत माहिती दिली. यानंतर काका व इतरांनी महिलेचा शोध सुरू केला. वरखेडे खुर्द शिवारात मक्याच्या शेतात शोध घेत असता मक्याचे ताटे ठिकठिकाणी तुटलेले आढळले. त्याच ठिकाणी रक्त सांडलेले दिसले. काचेच्या तुटलेल्या बांगड्याही मिळून आल्या. त्यामुळे काही तरी घातपात झाल्याचा कुटुंबीयांना संशय आला.
वाळूत पुरलेला मृतदेह आढळला
महिलेचा शोध सुरू असताना काही जण गिरणा नदीकडे गेले. त्यांना नदीपात्रात वाळूचा ढिग दिसला. ज्यात महिलेचा अर्धवट बुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तत्काळ पोलिस पाटील संतोष तिरमली यांना माहिती दिली. घडलेला प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देणार आली. यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. यात महिलेच्या डोक्यावर, दोन्ही कानांजवळ, छातीवर तसेच मांडीवर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तपासाच्या चक्रे फिरविले. सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांना या खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या संशयिताची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी एक टीम संशयिताच्या शोधार्थ पाठविले. संशयित हा वरखेडे खुर्दच्या डोंगराळ भागात बकऱ्या चारत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला पोलिस ठाण्यात आणल्यावर विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. संजय धोंडा गायकवाड (वय ३१, रा. वरखेडे खुर्द) असे संशयिताचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Discussion about this post