जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बी.टेक. (पेंट व प्लास्टीक टेक्नॉलॉजी) च्या तीन विद्यार्थ्यांची बर्जर पेंटस, सिंगापूर या नामांकित कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक २१ लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त झाले आहे.
केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत विद्यापीठातील विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेत या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. २३ विद्यार्थी या परिसर मुलाखतीसाठी उपस्थित होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद माळी व मनुष्यबळ विभागाच्या अंशूकुमारी यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये पेंट टेक्नॉलॉजीचे हेमांगी शेळके व विपुल पाटील आणि प्लास्टीक टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी निखील मोरखेडे या तिघांची निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन २१ लाख इतके दिले जाणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालक प्रा.जे.बी.नाईक, समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, डॉ.जितेंद्र नारखेडे, डॉ.रवींद्र पुरी व प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले.