मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यातच आता 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांची संभाव्य यादी
सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजप व शिवसेनेतील प्रत्येकी 10 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
या आमदारांची नावं देखील समोर आली आहे. भाजपकडून विदर्भ संजय कुटे, मुंबई योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, पश्चिम महाराष्ट्र माधुरी मिसाळ, मराठवाडा मेघना बोर्डीकर, उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, देवयानी फरांदे यांची नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाकडून कोकण योगेश कदम, भरत गोगावले, विदर्भ बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, मराठवाडा संजय शिरसाट, प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर मुंबई यामिनी जाधव, उ. महाराष्ट्र चिमणराव पाटील, सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज 18 लोकमतने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.