मुंबई : गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे यंदाचा मान्सून आणखी लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. साधारणपणे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होते. मात्र, यंदा मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू आहे. याआधी केरळमध्ये ४ जूनला मान्सून दाखल होईल, त्यानंतर महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
मात्र आता केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे. दुसरीकडे वळीवाच्या पावसाने मात्र राज्यातील बहुतेक भागात हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते १५ जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसहित विजांचा कडकडाट पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ७ आणि ८ जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Discussion about this post