जळगाव । एका विवाहितेने कुठल्यातरी नैराशाखाली येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद येथे आज सोमवारी दि. २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. जयश्री अमित महाजन (वय २२, रा. खालची आळी, नशिराबाद) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयश्री अमित महाजनचे पती अमित महाजन हे खाजगी व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. जयश्री महाजन यांच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलीवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते.
घरी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकटेच होत्या. त्यावेळेला त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तीन वर्षाची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली. दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंति त्यांना मयत घोषित केले.यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post