नाशिक । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकची जागा शिवसेनेकडे आली असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच नाशिकमध्ये शिंदे गट शिवसेनेतर्फे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र याबाबत अद्याप वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच याबाबत योग्य निर्णय घेऊन योग्य खुलासा करतील अशी भूमिका मांडताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या जागेबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच नाशिकमध्ये शिंदे गट शिवसेनेतर्फे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर आता मंत्री महाजन यांचे विधान नाशिकच्या जागेबाबत उत्कंठा वाढविणारे आहे. ते म्हणाले, की भाजपने २० लोकांची यादी जाहीर केली आहे. आमचे तीन मित्रपक्ष आहेत. सर्वांची खेळीमेळीत चर्चा सुरू असून, शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या पक्षांच्या जागा हा पूर्णत: त्यांचा विषय आहे, असेही महाजन म्हणाले.
भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वांचा विश्वास निर्माण झाल्याने आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची आता प्रचंड संख्या आहे. मी यापूर्वी सांगितले होते, की अनेक बॉम्ब फुटणार आहेत. पद्माकर वळवी नुकतेच आमच्याकडे आले आहेत. ते मुंबईत पोहोचत नाही तोच आणखी मोठी नावेही समोर येतील, असे सांगत राज्याच्या राजकारणात आणखी बॉम्ब फुटणार असल्याचा दावा महाजन यांनी केला.















Discussion about this post