जळगाव | भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली असून यात रावेर लोकसभा मतदार संघात विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. यातच शरद पवार गटाकडून रावेरमधून त्यांच्या विरोधात स्वत: एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असून यामुळे रावेरमध्ये सासरे विरुद्ध सून किंवा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे
त्यावर भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या रणांगणात नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, आता समोर सासरे असो की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही.
तसेच दुसरीकडे रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यांनतर रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही जणांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे? या प्रश्नावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, मतदारसंघात कुठलीही नाराजी नाही. सर्वांनी मला एक विश्वास दिला आहे. निवडणुकीत कोणतेही कमतरता भासू देणार नाही. जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून देऊ. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा विश्वास दिला आहे.















Discussion about this post