वरणगाव । घराला नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती १ हजारांची लाच मागणार्या वरणगाव येथील वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. अमीन शहा करामत शहा (३३, वरणगाव शहर ता. भुसावळ) असे लाचखोराचे नाव असून या कारवाईने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकार?
वरणगाव शहरातील २९ वर्षीय तक्रारदार यांच्या घराला नवीन वीज मीटर बसवण्यासाठी त्यांनी यापूर्वीच वीज कंपनीच्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. शिवाय डिमांड नोट भरण्यात आली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत तसेच सही-शिक्का मारून त्याची ओसी घेण्यात आली. तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा यांना वीज मीटर केव्हा बसवणार ? याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता केली. तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.
मात्र तक्रारदाराचे हावभाव पाहून वायरमन अमीन शहा यांना संशय आला व त्यांनी तक्रारदाराकडील व्हाईस रेकॉर्डर काढून त्याची मोडतोड केली. तत्पूर्वी त्यात १ हजार रुपये लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच लाच मागणी केल्याप्रकरणी संशयिताला अटक करीत त्याच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.
Discussion about this post